Ladki Bahin Yojana August Installment Update: राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांना खास भेट दिली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी या निर्णयासंदर्भातील घोषणा आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन केली आहे.
प्रक्रियेस आजपासून सुरुवात
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!” या मथळ्याखाली अदिती तटकरेंनी ही पोस्ट केली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे,” असं अदिती तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.
“महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे,” असं अदिती तटकरे म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्मानिधी म्हणून महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. अनेक लाभार्थी महिलांना खात्यावर पैसे आल्याचे मेजेस येऊ लागले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
बुधवारीच दिला लाडकी बहीणसंदर्भातील खात्यांबद्दलचा आदेश
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधारे तयार केलेल्या महिलांसाठीच्या व्यावसायिक कर्ज योजनेसाठी महामंडळांनी बँकेबरोबर आठ दिवसांत सामंजस्य करार करावा, असे निर्देश आदिती तटकरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागास विकास मंडळ आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. महिला व बालविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महामंडळाचे अधिकारी आणि मुंबई बँकेचे पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री तटकरे यांनी हे आदेश दिले आहेत.
बँकेची शासनाला विनंती
मुंबई बँकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष अभियान राबवून महिलांची शून्य शिल्लक रकमेची 53,357 इतकी बचत खाती उघडली असून महिला सशक्तीकरणासाठी व्यावसायिक कर्ज योजना सुरू केली आहे. महिलांसाठी सुरू केलेल्या या कर्ज योजनेची सांगड महामंडळाच्या व्याज परतावा योजनेशी घालण्याबाबत बँकेने शासनाला विनंती केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बैठक घेऊन बँकेच्या विनंतीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाबाबत महिला व बालविकास मंत्र्यांनी आढावा बैठक आयोजित केली होती.
काही अटी योजनेसाठी अडचणीच्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधारे महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुंबई बँकेने कर्ज योजनेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. महामंडळांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा बैठकीला विधान परिषदेचे गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी बैठकीत व्यक्त केली. सहकार आयुक्तांनी टाकलेल्या काही अटी या योजनेसाठी अडचणीच्या आहेत, त्या रद्द कराव्यात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात काही बदल करावेत, अशीही मागणी दरेकर यांनी बैठकीत केली. या सर्व सूचनांच्या अनुषंगाने विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
FAQ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे हा आहे. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक क्रांती म्हणून ओळखली जाते.
या योजनेची सुरुवात कधी झाली?
महाराष्ट्र शासनाने या योजनेची मान्यता 28 जून 2024 रोजी दिली आणि जुलै 2024 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. योजनेचे ऑनलाइन अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू झाले होते.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षांच्या वयोगटातील पात्र महिलांना हा लाभ मिळतो. लाभार्थी महिला राज्याची रहिवासी असावी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (BPL) असावी. विवाहित, अविवाहित, विधवा किंवा परित्यक्ता महिलांना पात्र ठरवलं जातं.