Last Updated:
Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकर यांना ‘एका पेक्षा एक’ या कार्यक्रमातून ‘महागुरू’ ही उपाधी मिळाली. मात्र आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : अभिनेते सचिन पिळगांवकर गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. यांनी आजवर मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमधूनही आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. मग तो ‘सत्ते पे सत्ता’ मधील सनी असो किंवा मग ‘नवरा माझा नवसाचा’ मधील वॅकी असो. सचिन पिळगांवकरांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.
सचिन पिळगांवकर यांनी सिनेमांबरोबरच अनेक रिॲलिटी शोचे परीक्षणही केले आहे. यातीलच एक महत्त्वाचा शो म्हणजे ‘एका पेक्षा एक’. या डान्स रिॲलिटी शोने मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. याच कार्यक्रमाने सचिन पिळगांवकरांना एक वेगळी ओळख मिळवून दिली, ती म्हणजे महागुरूंची. ‘एका पेक्षा एक‘ या डान्स रिॲलिटी शोमध्ये सचिन पिळगांवकर मुख्य परीक्षक असल्याने त्यांना महागुरू या नावाने संबोधले जात असे. कालांतराने ही त्यांची ओळखच बनली.
बहुतांश मराठी प्रेक्षक सचिन पिळगांवकरांना महागुरू या नावानेही ओळखतात. मात्र एका मुलाखतीत सचिन यांनी त्यांना या नावाने संबोधण्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीत सचिन यांना एक प्रश्न विचारण्यात आला. मुलाखतदाराने सचिन यांना विचारले की, “महागुरू ही उपाधी त्यांनी स्वतःहून लावून घेतली आहे का?“ त्यावर सचिन म्हणाले, “महागुरू या नावाला तुम्ही पदवी म्हणा किंवा मग आणखी काही, ते मी स्वतः घेतलेलं नाही. ते मला झी वाहिनीने दिलेलं आहे.“
याबाबत बोलताना सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, “मी स्वतःला महागुरू समजतच नाही किंवा मानतही नाही. मी स्वतःला जर काही समजत असेल तर कुटुंबप्रमुख. मला वाहिनीच्या लोकांनी पटवून दिलं की आपण ते नाव का वापरायला हवं. तेव्हा या कार्यक्रमात त्या मुलांचे गुरु सुद्धा असणार होते, जे त्यांना डान्स शिकवणार होते. ते गुरू होते, म्हणूनच त्यांच्यावर मी म्हणून मला महागुरू म्हटलं गेलं. पण मी स्वतःला कधीही महागुरू म्हटलं नाही. मी नेहमी स्वतःचा कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख करत असे.“
Mumbai,Maharashtra
April 07, 2025 6:31 AM IST
महागुरू म्हणत ट्रोल करणाऱ्यांना सचिन पिळगांवकरांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले ‘मी कुटुंबप्रमुख…’