Ahmedabad plane crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग 787 ड्रीमलाइनरबद्दल जगभरात प्रश्न उपस्थित केले जातायत. या विमान अपघातामागील इंजिन बिघाड हे कारण असल्याचे सांगितले जातंय. पण बॅटरी स्फोटासारख्या इतर काही भीतींबद्दल देखील चर्चा सुरु आहे. अपघातानंतर भारतीय विमान वाहतूक संस्था नागरी उड्डयन महासंचालनालय म्हणजेच डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर ताफ्याची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अहमदाबाद विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाल्यानंतर एक दिवसानंतर 12 जून रोजी हा आदेश जारी करण्यात आला.
बोईंगच्या 787-7 आणि 787-9 विमानांची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी केली जाणार आहे. सर्व अहवाल डीजीसीएला सादर केला जाणार आहे. त्याच वेळी डीजीसीएने एअर इंडियाला जेनएक्स इंजिनसह बोईंग 787-8 आणि 787-9 विमानांची अतिरिक्त देखभाल करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश 15 जूनपासून लागू झालाय. टाटा ग्रुपच्या एअर इंडियाच्या ताफ्यात 26 बोईंग 787-7 आणि 7 बोईंग 787-9 आहेत. बोईंग ड्रीमलाइनर्स काय आहेत? या विमानाच्या बॅटरीचाही स्फोट झाला का? नफ्यासाठी बोईंगने त्यातील त्रुटी का लपवल्या? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
बोईंग 787 ड्रीमलाइनर म्हणजे काय?
बोईंग 787 ड्रीमलाइनर हे अमेरिकन विमान कंपनी बोईंगने बनवलेले एक आधुनिक, मध्यम आकाराचे, ट्विन-इंजिन, वाइड-बॉडी जेट विमान आहे. ते लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले असून जुन्या बोईंग 767 ची जागा घेण्यासाठी आणलं गेलंय. हे इंधन-कार्यक्षम विमान आहे. या विमानाचा 50% भाग कार्बन फायबरसारख्या संमिश्र मटेरियलपासून बनलाय. ज्यामुळे ते हलके आणि मजबूत बनते. त्याच वेळी, ड्रीमलाइनरच्या खिडक्या कोणत्याही व्यावसायिक विमानात सर्वात मोठ्या आहेत. केबिनचा दाब 1900 मीटर उंचीवर ठेवला जातो, ज्यामुळे ऑक्सिजन 8% जास्त राहतो आणि थकवा कमी होतो. केबिनमध्ये रंग बदलणारे एलईडी दिवे आहेत, जे वेळ क्षेत्र बदलण्याचा परिणाम कमी करतात.
बोईंग 787 ड्रीमलाइनरमध्ये कोणत्या प्रकारची बॅटरी?
बोईंग 787 ड्रीमलाइनर त्याच्या सहाय्यक पॉवर युनिट (एपीयू) साठी आणि इलेक्ट्रॉनिक उड्डाण प्रणालींसाठी बॅकअप म्हणून लिथियम-आयन बॅटरी वापरते. या बॅटरी त्यांच्या उच्च ऊर्जा घनतेसाठी आणि दीर्घ आयुष्य चक्रासाठी निवडल्या गेल्या होत्या. अति तापणे आणि आग यासारख्या सुरक्षिततेच्या समस्यांशी हे संबंधित आहे. ज्यामुळे 2013 मध्ये संपूर्ण 787 फ्लीट तात्पुरते ग्राउंड करण्यात आले. असे असले तरी एअर इंडिया विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
या बॅटरी किती धोकादायक?
ड्रीमलाइनर दोन लिथियम-आयन बॅटरींनी चालते. मुख्य बॅटरी समोर आणि दुसरी मागील बाजूस वर आहे. लिथियम-आयन बॅटरी 1000 अंश सेंटीग्रेडपर्यंत आग पकडू शकतात. हे ड्रीमलाइनरच्या कार्बन फायबर बॉडीच्या 343 अंशांच्या उष्णता सहनशीलतेच्या तिप्पट आहे. या बॅटरीमध्ये वापरलेला इलेक्ट्रोलाइट द्रव लवकर आग पकडू शकतो.
लिथियम आयन बॅटरीमधील दोषाचा मुद्दा आला होता समोर
सप्टेंबर 2012 मध्ये तत्कालीन सरकारी मालकीच्या एअर इंडिया लिमिटेड (एआयएल) च्या ताफ्यात सामील झाल्यानंतर लगेचच, सर्व सहा नवीन बोईंग 787 ‘ड्रीमलाइनर्स’ चार महिन्यांहून अधिक काळ (17 जानेवारी 2013 ते 4 जून 2013 पर्यंत) त्यांच्या लिथियम-आयन बॅटरीमधील दोषांमुळे ग्राउंड करण्यात आल्या.
लिथियम-आयन बॅटरीमध्ये आग, 3 महिने उड्डाण करू शकली नाही
जानेवारी 2013 मध्ये, दोन जपानी विमान कंपन्यांच्या ताफ्यात दोन नवीन ड्रीमलाइनर 787-8 विमाने जोडण्यात आली. त्यामध्ये बसवलेल्या लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरीजना आग लागली. एका विमानाला बोस्टन विमानतळावर उभे असताना आग लागली, तर दुसऱ्या ड्रीमलाइनरने आधीच उड्डाण केले होते. आगीमुळे त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. यानंतर, यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने जगभरातील सर्व ड्रीमलाइनर विमानांच्या उड्डाणांवर 3 महिन्यांसाठी बंदी घातली. बोईंगने त्यांच्या बॅटरी सिस्टीममध्ये आणि त्याच्या इन्सुलेशनमध्ये सुधारणा केल्या. ज्यामुळे बॅटरी इंजिनच्या उष्णतेपासून संरक्षित राहते.
बोईंगने मान्य केली होती चूक
2020 ते 2022 दरम्यान ड्रीमलायनरमध्ये अनेक वेळा मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट्सच्या बातम्या आल्या. खरंतर ड्रीमलायनर हे वाइड-बॉडी पॅसेंजर प्लेन आहे. त्याचे भाग वेगळे बनवले जातात, जे नंतर जोडले जातात. या काळात बॉडीच्या जोडलेल्या भागांमध्ये मोठ्या गॅपच्या तक्रारी अनेक विमानांमध्ये आल्या. बॉडीमध्ये वापरलेले कार्बन-फायबर पार्ट्स देखील योग्यरित्या जोडले गेले नव्हते. बॉडीचा कल देखील बरोबर नव्हता. 2020 ते 2022 दरम्यान, बोईंगने एअरलाइन्सना ड्रीमलायनरची डिलिव्हरी थांबवली. अमेरिकन एजन्सी एफएएने देखरेख वाढवली आणि इतर अनेक कंपन्यांना विमाने पोहोचवण्याची परवानगी दिली. ड्रीमलायनरच्या निर्मितीमध्ये अनेक अनियमितता असल्याचे बोईंगनेही मान्य केले.
बोईंगची विमानाबद्दल कबुली
उत्पादन पद्धतीत बदल झाले आहेत पण यामुळे विमानाच्या ताकदीवर आणि आयुष्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे या आरोपांनंतर बोईंगचे प्रवक्ते पॉल लुईस यांनी कबूल केले. आम्ही विमानाच्या पायाभूत सुविधांची तपासणी करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. बोईंगने सॅमचे दावे फेटाळून लावले आणि ड्रीमलायनर 787 पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.